Today's thoughts are tomorrow's things


अमेरिकी मॉडेल झाली ‘न्यू थॉट’ महागुरू :ल्युईस हे.
आपल्याकडे  स्वामी, बाबा, ‘गुरु’ ‘महागुरू’ अशी नावे धारण करणा-या व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात येतात त्या त्यांची भयंकर अनैतिकता किंवा भ्रष्टाचार उघड झाल्यावर ! या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ‘फॅशन मॉडेल’ म्हणून एकेकाळी गाजलेल्या आणि आज न्यू थॉट विचारसरणीतील जेष्ठ गुरु मानल्या जाणा-या श्रीमती ल्युईस हे यांची कथा मोठी रोचक आहे. न्यू थॉट चळवळीने जगभर जसे अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यातील बदलाचे विक्रम घडविले तसेच एका नव्या जीवनशैलीने समाजाची मानसिकता कशी बदलली जाऊ शकते ते सिद्ध करणारी प्रात्यक्षिकेही दिली.
श्रीमती ल्युईस हे यांचा जन्म लॉस एंजेलिस येथे एका अत्यंत गरीब घरात १९२६ साली झाला. पती सोडून गेल्याने त्यांच्या आईने एकट्यानेच त्यांचे संगोपन केले. संसारात जोडीदार हवा म्हणून आईने केलेले दुसरे लग्नही फसले.  त्यांच्या नव्या वडिलांनी तर आई आणि मुलगी अशा दोघांवर अत्याचार केले.  केवळ व्या वर्षी खुद्द ल्युईस यांच्यावर शेजा-यानेच लैंगिक अत्याचार केला. असे खिन्न बालपण मिळालेल्या ल्युईस यांनी वयाच्या १५ व्या वर्षीच शिक्षण मधेच सोडून दिले तर नवल नव्हते. कुमारी गर्भवती झालेल्या त्यांनी टोकाच्या गरिबीमुळे आपले बाळ अनाथालयाला देऊन शिकागो शहराकडे प्रयाण केले. तेथे अगदी हलकी कामे करून कसबसा उदरनिर्वाह करीत त्या न्यूयॉर्कला आल्या. 

अतिशय सुंदर असणा-या श्रीमती हे यांनी तेथे आपले नाव बदलून एक ‘फॅशन मॉडेल’ म्हणून कारकीर्द सुरु केली. तेंव्हाचे प्रसिद्ध फॅशनगुरु बील ब्लास, ओलेग कॅसिनी, पॉलीन ट्रीजेर यांच्याबरोबर काम केल्यावर त्यांना न्यू यॉर्कमध्ये फॅशन जगतात चांगलेच यश मिळाले, ब्रिटीश उद्योजक श्री. अँड्र्यू यांचेशी लग्नही झाले. आता आयुष्याला काहीतरी वळण लागले या आनंदात असताना तब्बल १४ वर्षांनी ते लग्नही मोडले. संपूर्ण आयुष्य संघर्षात घालविल्यावर उभा राहिलेला संसार पती दुस-या बाईच्या प्रेमात पडल्याने अचानक मोडला.  आता मात्र  त्या पूर्णपणे  कोसळल्या. पण त्यांच्या हातून नियतीला काही जगावेगळे करून घ्यायचे होते म्हणूनच ही दुर्घटना घडली असावी कारण याच वेळी  हे बाई फर्स्ट चर्च ऑफ रिलीजस सायन्स’च्या संपर्कात आल्या. तेथे त्यांनी  विचारांच्या परिवर्तनशक्तीचा अभ्यास केला. या आगळ्या चर्चमध्ये त्यांनी फ्लॉरेन्स स्कोवेल शिन आणि अर्नेस्ट होल्म्स या विचारवंतांच्या साहित्याचा अभ्यास केला.  आयोवा येथे जाऊन तेथील ‘महर्षी विद्यापीठात’ महर्षी योगींच्या ‘भावातीत समाधी’चाही (Transcendental meditation.) सखोल अभ्यास केला.
अजूनही त्यांच्या आयुष्यातील नाट्य संपलेले नव्हते. त्यांना 1977-78 दरम्यान ‘ब-या न होऊ शकणा-या सर्व्हायकल कर्करोगा’ने गाठले.  मात्र यामुळे खचून न जाता त्यांनी आपल्या रोगाचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. मनात बालपणाबद्दल आणि बालपणी ज्यांनी अत्याचार केले त्यांच्याबद्दल साठून राहिलेल्या क्रोधामुळे ही व्याधी झाली असे लक्षात आल्यावर हे बाईनी सर्वांना मनापासून क्षमा करण्याची मानसिक प्रक्रिया सुरू करुन आहारात काही बदल आणि शरीरशुद्धीच्या सहाय्याने या असाध्य रोगावर विजय मिळविला.

या अनुभवाचा लाभ इतरांनाही व्हावा म्हणून त्यांनी १९७६ साली ‘विविध रोग आणि त्यांची अध्यात्मिक कारणमीमांसा’ या विषयावर (Heal your body) नावाची एक छोटी पुस्तिका प्रकाशित केली. त्यांचे चिंतन-मनन सुरुच होते. सर्वाचा परिपाक म्हणून  १९८४ साली त्यांचे तब्बल ४० दशलक्ष प्रती विकले गेलेले जगप्रसिद्ध पुस्तक ‘You can heal your life.’ प्रकाशित झाले. न्यूयॉर्क टाईम्सच्या बेस्ट-सेलर पुस्तकांच्या यादीत १९८४ पासून अगदी २००८ पर्यंत हे पुस्तक दुस-या क्रमांकावर होते. त्याची भाषांतरे जगभरच्या ५० भाषात झालेली आहेत. दरम्यान ‘एडस’ झालेल्या लोकांसाठी त्यांनी स्वत:च्या घरातच एक संस्थाही काढली. आज खूप वाढलेल्या या संस्थेचा लाभ वेस्ट हॉलीवूडमधील भव्य इस्पितळात शेकडो रुग्ण घेत आहेत.

चक्क कँन्सरवर विचारांनी विजय मिळविणा-या या महागुरुचे मुख्य प्रतिपादन काय आहे? माणसाचे सर्व आयुष्य त्याच्या मनात निर्माण झालेल्या धारणांमुळे प्रभावित होत असते. एखाद्या वृक्षाच्या खोडात जशा दरवर्षी गाठी निर्माण होतात तसेच एखादा विचार सतत करीत राहिल्यामुळे माणसाच्या मनात दृढ धारणा निर्माण होतात. माणसाचे सुप्तमन त्याच्या आयुष्याचे नियोजन आणि नियंत्रण या धारणांना “त्रिकालाबाधित सत्य” मानून करीत असते त्यामुळे काही लोकांचे जीवन  सुंदर बागेतील रम्य प्रवास बनते तर काहीचे रखरखीत वाळवंटातील एक कंटाळवाणा प्रवास ठरते. वॅलेस वॅटेल्स यांनी म्हटल्याप्रमाणे सर्व विश्व हे एकाच चेतनेचे खंडित झालेले आविष्करण आहे. कोणतीही व्यक्ती, वस्तू वेगळी नाही. माणसाच्या विचारांचा जड जगावर सतत परिणाम होतो कारण जीवसृष्टी व जडसृष्टी एका अदृश्य धाग्याने जोडलेली आहे. श्रीमती हे यांनी वॅटेल्स यांचा हाच धागा पुढे नेऊन माणसाला होणा-या सर्व व्याधींची कारणमीमांसा केली आहे. त्यांच्या मते आपण मनात जे विचार घोळवत असतो त्यानुसारच आपल्याला वेगवेगळे रोग होतात. खरे तर ‘न्यू थॉट’चे हे सर्वसाधारण मत आहे परंतु लुईस हे यांचे विशेष योगदान हेच की त्यांनी असंख्य रोगांची एक यादी आपल्या पुस्तकात दिली असून तो प्रत्येक रोग कोणत्या विचारामुळे होतो हे शोधून काढले आहे. त्या एवढेच करून थांबल्या नाहीत तर प्रत्येक रोगावर उपाय म्हणून त्याऐवजी दुसरा कोणता विचार करावा हेही त्यांनी सांगितले आहे. म्हणूनच स्वत:ला होऊन गेलेला असाध्य कर्करोग या प्रकारे पूर्ण बरा करून स्वत:चे उदाहरण समोर मांडणा-या हे या आरोग्याच्या ‘महागुरू’ ठरतात. त्यांचे म्हणणे आहे विचार म्हणजे आपल्या मनाच्या आत कुठेतरी खोल घडणारी एक गुप्त घटना नसून विचारस्फंदने ही विश्वातील महत्वाच्या घटना असतात. आजच्या विचारस्फंदनातून उद्याचे वास्तव निर्माण होत असते. “Today’s thoughts are tomorrow’s things.” या ‘न्यू थॉट’ तत्वाचे प्रात्यक्षिक  म्हणजे  श्रीमती हे यांचे जीवन आहे. 

रोजच्या जेवणाची भ्रांत असल्याने बालपणीच घर सोडून  बाहेर पडलेल्या श्रीमती हे या आजच्या ९० वर्षीय कोट्याधीश आहेत आणि “हे फौंडेशन” या त्यांच्या सेवाभावी प्रतिष्ठानामार्फत आपली श्रीमंती समाजकार्यासाठी वापरत आहेत. अत्यंत प्रांजळपणे लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकात त्या लिहितात, ‘ज्यांनी मला कोवळ्या वयात प्रचंड यातना आणि दु:ख दिले, माझे बालपण कोमेजून टाकले त्यांना मी माफ करू शकत नव्हते, त्यांचा सूडही उगवू शकत नव्हते. माझ्या मनात साठलेल्या अव्यक्त क्रोधाचे रुपांतर कर्करोगात झाले. मी जेव्हा न्यू थॉट विचारसरणीचा अभ्यास केला तेव्हा मला पटले की आपण सगळे “बळींचे बळीचे” ‘Victims of victims’ आहोत. आपल्याशी वाईट वागलेली व्यक्ती तिच्या अज्ञानामुळे किंवा कुणाचातरी राहून गेलेला सूड घेण्यासाठी आपल्याला त्रास देत असते. तिचा सूड घेण्याचा प्रयत्न करणे किंवा आपण तिच्यापेक्षा फार अशक्त असलो तर तिचा सूड घेण्याची इच्छा नुसती मनातही बाळगणे योग्य नाही.’ या ठिकाणी आपल्याला येशू ख्रिस्ताची आठवण येते. तो क्रुसावर मरणासन्न अवस्थेत लोंबकळत असतांनाही देवाकडे प्रार्थना करून आपल्या मारेक-यांची वकिली करताना दिसतो. “देवा यांना क्षमा कर, कारण आपण काय करतो ते त्यांना कळत नाही.” येशूचा तो विचार केवळ एक अध्यात्मिक किंवा अलंकारिक विधान नसून रोजच्या जगण्यात उपयोगी पडणारे एक महान तथ्य आहे हे लुईस हे यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. हेच त्यांचे सर्वात मोठे योगदान आहे.

एकंदरच सकारात्मक विचारसरणीचे महत्व सांगताना त्या म्हणतात चिंता करणे म्हणजे  ‘भविष्य नक्की वाईट असणार’ असा विश्वास धरण्यासारखेच आहे. त्यामुळे आपण वैश्विक शक्तींना आपण आपले भविष्य तसेच घडवायला आमंत्रित करत असतो. त्याऐवजी सतत आरोग्यसंपन्न असण्याचा विचार करुन आपण सर्व रोगापासून आपले संरक्षणही करू शकतो. एवढेच नव्हे तर असलेले असाध्य  रोगही केवळ विश्वास, श्रद्धा आणि प्रामुख्याने विचार बदलून बरे करू शकतो. लुईस हे या १०० टक्के आस्तिक आहेत मात्र अमेरिकी समाजाला स्वीकारार्ह व्हावे म्हणून त्या देवासाठी ‘गॉड’ हा शब्द न वापरता ‘युनिव्हर्स’ हा शब्द वापरतात.  त्यांच्या या युक्तीमुळे बराचसा निरीश्वरवादी बनलेला अमेरिकी समाजही अध्यात्माकडे वळू लागला आहे.
विचारशक्तीचा  उपयोग  केवळ रोगमुक्ती  किंवा आरोग्यासाठीच होतो असे नाही तर  या शक्तीच्या योग्य उपयोगाने विपुल संपत्ती, मानसिक शांती, कौटुंबिक सौख्य, प्रेम आणि यशही मिळू शकते असा त्यांच्या दावा आहे. श्रीमती हे स्वत: नियमित योग करतात. त्या मुळात पौर्वात्य असलेली पुनर्जन्माची संकल्पाना असलेला मानतात. गीतेत सांगितलेल्या कर्मसिद्धांतावर त्यांची श्रद्धा आहे म्हणून त्या नेहमी सत्कर्माचा आणि निरपेक्ष प्रेमाचा उपदेश करतात. स्वत: अतिशय दु:खी आणि वेदनामय जीवनाचा अनुभव घेऊन, ते विष शांतपणे पचवून, जगाला प्रेमाचे, सद्वर्तनाचे अमृत देऊ करणा-या या आधुनिक गुरूमाईला वंदनच केले पाहिजे.  

*******
  -श्रीनिवास बेलसरे.
७२०८६३३००३

Comments